
पुण्याची खरी ओळख छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, लाल महाल आणि स्वराज्य स्थापनेचा आदर्श
पुणे |
पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची एक मागणी सध्या केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. पुणेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला जोडलेले हे स्थानक अचानक नाव बदलण्याच्या प्रक्रियेतून जावे, यावर इतिहासप्रेमी आणि पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. शंकर चव्हाण, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांनी स्पष्ट शब्दांत या मागणीला अप्रत्यक्षपणे विरोध करत, पुण्याची खरी ओळख कोणती आहे हे ठामपणे सांगितलं आहे.
“पुण्याचा इतिहास पाहता, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, लाल महाल आणि स्वराज्य स्थापनेचा आदर्श हीच खरी पुण्याची ओळख आहे. लाल महालातूनच शिवबा घडले, तिथेच जिजाऊसाहेबांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. पुणे म्हणजे केवळ स्वराज्याचे आद्य संस्कार स्थान – छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणाचे माहेरघर!” असे अॅड. चव्हाण यांनी X (पूर्वी ट्विटर) वरील पोस्टद्वारे स्पष्ट केले.
त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव न घेता, नाव बदलाच्या मागणीला अप्रत्यक्ष विरोध करत “इतिहास बदलण्याचा नव्हे, जपण्याचा काळ आहे” असं मत व्यक्त केलं.
“पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याऐवजी, त्या स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि लाल महाल यांचा ऐतिहासिक ठसा अधोरेखित केला जावा. पुण्याचं नाव कुणाच्याही महिमेतून नाही, तर शिवरायांच्या विचारातून उजळलेलं आहे.” – असंही त्यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.
आजवर लाल महाल हे फक्त एक वास्तू नव्हे, तर हिंदवी स्वराज्याच्या विचारांची जन्मभूमी मानली जाते. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा पाया इथंच घातला. बाल शिवबांना मूल्यांची, स्वाभिमानाची आणि शौर्याची शिकवण याच पुण्यात मिळाली. या ऐतिहासिक पार्श्वभूमीला डावलून कोणत्याही नवीन नावाला स्थान देणे म्हणजे इतिहासाशी अन्यायच ठरेल, असे अॅड. चव्हाण यांचे स्पष्ट मत आहे.
“ज्या नावाने स्थानकाला नवीन ओळख द्यायची आहे, त्या नावामध्ये जर लाल महाल, स्वराज्य, शिवराय, किंवा जिजाऊ यांचा विचारही नसला, तर तो फक्त राजकीय हेतूचा भाग वाटतो. पुणे ही केवळ राजधानी नव्हे तर विचारांची नगरी आहे. इथल्या नावांवर भावनांचा आणि इतिहासाचा अधिकार आहे,” असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अनेक सामाजिक संस्था, संघटना किंवा प्रतिष्ठाने एकतर्फी मागणी करत असतील तरीही, पुणेकरांना विचारात न घेता असे निर्णय घेणं लोकशाही प्रक्रियेचेही उल्लंघन आहे, असं अॅड. चव्हाण यांचं म्हणणं आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या प्रस्तावाला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवत अॅड. शंकर चव्हाण यांनी भारत सरकारचे रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना अधिकृत ई-मेलद्वारे एक सविस्तर आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून मांडलेले पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, पुण्याचे खरे आणि मूळ स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि लाल महालाच्या प्रेरणेने घडलेले आहे. नामांतरासारख्या कृतीमुळे या ऐतिहासिक ओळखीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे पुणेकरांच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. स्थानकाचे नाव बदलण्याऐवजी शिवकालीन वारसा जपणाऱ्या उपक्रमांवर भर द्यावा अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. ही कारवाई केवळ सामाजिक प्रतिक्रियेपुरती मर्यादित न राहता, थेट भारत सरकारच्या पातळीवर पोहोचलेली आहे, यामुळे अॅड. शंकर चव्हाण यांचा या विषयावरील विरोध अधिक ठाम, समर्थ आणि परिणामकारक ठरतो.