
बीड प्रतिनिधी :- शहरापासून जवळच असलेल्या वासनवाडी शिवारात सराईत गुन्हेगार भिमा मस्केच्या टोळीसह वडवणी येथील एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत घरफोडीचेही चार गुन्हे उघड केले असून सहा जणांना सापळा रचून ताब्यात घेत ३ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बीड शहरातून भिमा लक्ष्मण मस्के (वय ३९) रा. बलभिम नगर, वतारवेस, बीड, विजय वसंत तायड (वय २५) रा.माऊली नगर, बीड आणि हुसेन बशीर शेख (वय ४५) रा. पावरहाऊस जवळ, माऊली नगर, बीड या तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून चोरी केलेली ५०० किलो अॅल्युमिनियम तार जप्त करून आरोपींना बीड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या(LCB) पथकाने वीरसिंग शेरसिंग गोके (वय २४) रा. पोलीस कॉलनी शेजारी अंबाजोगाई, मोहनसिंग मोहब्बतसिंग टाक (वय २१) रा. बस स्थानकाच्या पाठीमागे वडवणी आणि जिगरसिंहग मोहब्बतसिंग टाक (वय १९) रा. बस स्थानकाच्या पाठीमागे वडवणी यांना वडवणी येथून ताब्यात घेवून त्यांनी केलेल्या चार घरफोडीच्या व चोरीचे दोन गुन्हे निष्पन्न केले. या तिघांच्या टोळीने धारूर, अंबाजोगाई शहर, ग्रामीण, नेकनूर, परळीतील संभाजीनगर या पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे केल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलीसांनी सांगितले. अॅल्युमिनियम तार, पाणबुडी मोटारी चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या टोळ्या गजाआड करून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोन्ही टोळ्यातील आरोपींकडून कॉपर केबलचे तीन बंडल, पाणबुडी व बोरच्या सहा मोटारी, पाच शेळ्या असा एकूण ३ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, जप्त मुद्देमाल व आरोपींना धारूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवर, अप्पर अधिक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे,पो.ह. रामचंद्र केकान, मारूती कांबळे, सोमनाथ गायकवाड, विष्णू सानप, पोलीस नाईक गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे यांनी केली.
