
बीड प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मोठी कारवाई केली. अहिल्यानगर येथील एका वैध ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरून वापरत ‘गुलजार ए-रझा’ नावाच्या बनावट ट्रस्टद्वारे धार्मिक कामाच्या नावाखाली ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करून त्याचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एटीएसने दोघांना ताब्यात घेतले असून अंबाजोगाईच्या इमरान कलीम शेख याच्यासह चार जणांविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी या धडक कारवाईला दुजोरा दिला आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पात्रुड येथे गुलजार ए-रझा ट्रस्टचा फलक लावून व्यवहार सुरू केले होते. त्यांनी अहिल्यानगरच्या ‘फैजान ए-कन्झूल इमान’ या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून लातूरमधील ॲक्सिस बँकेत पाच बनावट खाती उघडली होती. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर या ट्रस्टची नोंदणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीत निष्पन्न झाले आहे. या खात्यांमध्ये जमा झालेला कोट्यवधींचा निधी धार्मिक उपक्रमांसाठी असल्याचे भासवून आरोपींनी तो स्वतःच्या फायद्यासाठी वळवला.
या प्रकरणी पोलिसांनी गुलजार ए-रझा ट्रस्टचा अध्यक्ष इम्रान कलीम शेख (रा. सदर बाजार, अंबाजोगाई), उपाध्यक्ष मुज्जम्मिल नूर सय्यद (रा. सत्तार गल्ली, पात्रुड), सचिव अहमदुद्दीन कैसर काझी (रा. रोजा मोहल्ला, केज) आणि विश्वस्त तौफीक जावेद काझी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील मुज्जम्मिल नूर आणि अहमदुद्दीन काझी या दोघांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयात या ट्रस्टची अधिकृत नोंदणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमानुसार कोणत्याही संस्थेची डीड नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे असणे अनिवार्य असताना, आरोपींनी प्रशासनाची दिशाभूल करून हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
