
बीड प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने साहित्य पळवून नेणारा आणि मागील एक वर्षापासून हैदराबाद येथे फरार असलेला सराईत गुन्हेगार सय्यद अनवर याला बीड शहर पोलिसांनी बीड जिल्हा परिषदेच्या आवारातून सापळा लावून गजाआड केले.
सय्यद अन्वर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी अशोक रोहिदास कांबळे (रा. साखरे बोरगाव, ह.मु. बीड) हे जिल्हा परिषद कार्यालयासमोरील जागेत पत्र्याचे शेड मारण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी १) सय्यद अनवर सय्यद मुजावर आणि २) यासिन खान
पठाण (दोघे रा. बीड) यांनी तेथे येऊन फिर्यादीस फरशी कुऱ्हाड व तलवारीचा धाक दाखवून, कामासाठी लागणारे २५,०००/- रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, कटर मशीन व ड्रिल मशीन बळजबरीने चोरून नेले होते. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सय्यद अनवर हा गुन्हा केल्यापासून मागील एक वर्षापासून हैदराबाद येथे पळून गेला होता व पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, बीड शहर पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, हा आरोपी बीडमध्ये आला असून जिल्हा परिषद आवारामध्ये संशयास्पदरित्या फिरत आहे. या माहितीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस हवालदार सय्यद शहेनशहा, गहिनीनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार आणि इलियास शेख यांच्या पथकाने केली आहे.
