*विविध कल्याणकारी महामंडळे व शासकीय योजनांचा लाभ घ्या – महेश शिंदे यांचे आवाहन* *माणुसकी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश शिंदे यांचा जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्याचा दौरा* *शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, गोरगरीब, गरजू आणि महिला भगिनींना भेटून साधला संवाद* =======================
अंबाजोगाई प्रतिनिधी
माणुसकी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते महेश शिंदे यांनी सोमवारी बीड, अंबाजोगाई, केज व धारूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, गोरगरीब, गरजू आणि महिला भगिनी यांच्या भेटी गाठी घेवून त्यांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न समजून घेतल्या. आणि त्यांना विविध कल्याणकारी महामंडळे व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
याबाबत अंबाजोगाई येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माणुसकी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते महेश भाऊ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचे व्हिजन आपणांस माहित आहे. जिल्ह्यातील जनतेच्या विविध अडीअडचणी, समस्या, प्रश्न समजून घेत त्यांची माहिती आपण उपमुख्यमंत्री ना.दादांना देणार आहोत. दादांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण बीड जिल्ह्याचा झंझावाती दौरा करीत आहोत. सर्वप्रथम महेशभाऊ शिंदे यांनी बीड येथे शासकीय विश्रामगृहावर माणुसकी सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यां सोबत चर्चा केली. थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणा-या पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन, बीड येथे आयोजित करण्यात आला होता. तर अंबाजोगाई येथे शासकीय विश्रामगृहात विविध सामाजिक संघटना, समविचारी मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांनी युवकांसोबत विविध विषयांवर विधायक चर्चा केली. श्री.योगेश्वरी देवी मंदिरात महापुजा करून महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार, महिला, युवक, दीन दलित यांना सुखा-समाधानाचे दिवस येवु दे म्हणून शिंदे यांनी योगेश्वरी मातेच्या चरणी साकडे घातले. त्यानंतर मौजे कुंबेफळ येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी येथील माणुसकी सेवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे ह्रद्य स्वागत करण्यात आले. पुढे त्यांनी मौजे देवळा येथे नापिकी, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांची, नुकसानीची पाहणी केली. या ठिकाणी नापिकी, कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांची सद्यस्थिती व आरक्षण या विषयांवर शेतकरी, शेतमजुर, महिला, युवकांसोबत चर्चा केली. तसेच देवळा येथील मारूती ज्ञानोबा पवार या शेतकऱ्याने नुकतीच बुधवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेत आत्महत्या केली. मयत शेतकरी बांधव पवार यांच्या घरी भेट देवून कुटुंबाचे सांत्वन केले. व तेथूनच थेट अंबाजोगाईचे तहसीलदार यांना या संदर्भात मयत शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत करण्याबाबत कार्यवाही करावी असे सांगितले. त्यानंतर मौजे देवळा गांवकरी, शेतकरी, शेतमजुर यांच्यासह मांजरा नदीचे जलपुजन केले. अंबारी शासकीय विश्रामगृहावर शिकलकरी व मुस्लिम समाजातील महिला भगिनींशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या समस्या व प्रश्न समजून घेत त्यांना माणुसकी सेवा फाऊंडेशनच्या वतीने कार्यकर्त्यांनी शासनाकडून सर्वोतोपरी मदत व सहकार्य मिळवून देण्याचे आदेश दिले. संपूर्ण बीड जिल्ह्याचा दौरा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड.गोरक्ष लोखंडे, माणुसकी सेवा फाऊंडेशनचे बीड जिल्हाध्यक्ष सर्जेराव मस्के, धारूर तालुकाध्यक्ष प्रविण भालेराव, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रकाश वेदपाठक, तालुका सचिव संजय तेलंग, पदाधिकारी सर्वश्री अंकुश गंगावणे, शेख नासेर, ॠषिकेश शिंदे, सय्यद अमजद, महेश वेदपाठक, प्रमोद गाढे, अजय आगळे, गोविंद कोरळकर, सुंदर काळे आणि श्रीमती रेश्मा शेख, श्रीमती मदिना शेख, श्रीमती अलका साळुंखे इत्यादींनी पुढाकार घेतला होता.
*माणुसकी सेवा फाऊंडेशन जनसेवेसाठी तत्पर :*
संपूर्ण बीड जिल्ह्याचा दौरा करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, गोरगरीब, गरजू आणि महिला यांच्या भेटी गाठी घेत संवाद साधला. या दौऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना मिळालेली सर्व माहिती देणार आहोत. बीड जिल्ह्यातील जनतेला विविध कल्याणकारी महामंडळे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जनसेवेसाठी तत्पर असलेल्या गरजू, वंचित व्यक्ती आणि कुटुंबियांना माणुसकी सेवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सर्वोतोपरी मदत व सहकार्य करावे.
*- महेश शिंदे*
(अध्यक्ष, माणुसकी सेवा फाऊंडेशन तथा प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष)