सौ.दिपाली काठी यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना संस्कारीत करण्याचे भाग्य मला लाभले – सौ.दिपाली काठी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावा या हेतूने शिक्षकी पेशाच्या माध्यमातून प्रयत्न केले. या प्रयत्नांना माझे कुटूंब व सहकार्यांनी मला विशेष साथ दिल्याने माझा 38 वर्षांचा शिक्षिकी पेशाचा कार्यकाळ यशस्वी झाला. ग्रामिण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण होण्याची गरज असून या गरजेतूनच हा ग्रामिण भाग शिक्षणाच्या नकाशावर येईल व ग्रामिण भागाचा खर्या अर्थाने विकास होईल. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा पठाण येथे शिक्षीका सौ.दिपाली मनोजराव काठी-पिंगळे यांनी दिली.
आपल्या 38 वर्षांच्या शिक्षकी पेशातून त्या उद्या शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, शिक्षकी पेशा हा समाजाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. व त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना योग्य संस्कारीत केले. हे करत असताना अभ्यासाबरोबरच शैक्षणिक सहल, विविध शालेय स्पर्धा अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे त्यांनी प्रयत्न केला. बर्दापुर येथील प्रथम नेमणूक झाली. माहेर व आजोळच्या शैक्षणिक परंपरेमुळे माझ्या शिक्षकी पेशाला अधिक प्रोत्साहन मिळाले. माझे दोन चुलत भाऊ, दोन मामा, दोन मामी या शिक्षकी सेवेतच असल्यामुळे त्यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मला मिळाले. मी शिक्षकाचा पदभार घेतला तेंव्हा गटशिक्षणाधिकारी मार्तंडराव पत्की व शिक्षणाविस्तार अधिकारी फडके यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना मला जीवनात अनेक अनुभव घेता आले. परिणामी उत्तम शैक्षणिक कार्यासाठी संधी प्राप्त झाली व माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला. यातच मला सार्थ अभिमान आहे. ग्रामिण भागात नियुक्तीमुळे विद्यार्थी-पालक व ग्रामस्थ यांच्यामध्ये समरस होण्याची संधी प्राप्त झाली. अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शैक्षणिक साहित्य, उपक्रम विज्ञान प्रदर्शन, विविध स्पर्धा, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम घेवून या माध्यमातून ज्ञानार्जन केले. एकुण 38 वर्षे सेवा झाली. मी ज्या-ज्या ठिकाणी नौकरी केली. त्या-त्या ठिकाणाहून मला पालक-विद्यार्थी-ग्रामस्थ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले.
तसेच वडीलधारी मंडळींचे मार्गदर्शन मिळाले. मला एकुण 6 गावात शैक्षणिक सेवा करण्याची संधी मिळाली.बर्दापुर येथील 9 वर्षे, शेपवाडी येथे 10 वर्षे, पुस येथे 6 वर्षे, परळी तालुक्यात इंदपवाडी येथे 4 वर्षे, मगरवाडी येथे 3 वर्षे, मांडवा पठाण येथे 6 वर्षे असे एकुण 38 वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. मी ज्या शाळेत नौकरी केली. त्या ठिकाणचे मुख्याध्यापक व शिक्षक सहकारी यांचे चांगले सहकारी मिळाले. नवनविन अनुभवासोबत सर्वत्र सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्याने 38 वर्षांच्या कार्यकाळात ग्रामिण भाग शैक्षणिक नकाशावर आणण्याचा प्रयत्न मी केला व त्याचे मला समाधान लाभले.