ऑनलाईन रमीत पैसे हरला, कर्जबाजारी तरुणाने पत्नी अन् मुलाला पाजलं विष..
धाराशिव प्रतिनिधी:–
धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने स्वत:ची पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुरड्यालाही ठार मारले. धाराशिवमधील बावी गावात हा प्रकार घडला. लक्ष्मण मारुती जाधव (वय २९) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मणने आपल्यासोबत कुटुंबालाही संपवल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन रमी खेळायचा. मात्र, ऑनलाईन रमीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर मोठे कर्ज जमा झाले होते. त्यामुळे लक्ष्मण जाधव हा प्रचंड नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नसून पोलिस तपास सुरू आहे. लक्ष्मण मारुती जाधव, असे आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी (वय २१) यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे तो तणावात होता. दरम्यान, त्याने रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन मारून त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व शक्यता गृहीत धरुन तपास करत आहेत. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.