आता आरपारची लढाई; २९ ऑगस्टला मुंबई गाठायची अन्…
जालना प्रतिनिधी:– आता आपल्याला रणभूमीत उतरुन लढायचे, मैदान गाजवायचे अन् विजय खेचून आणायचाय. (दि.२७) ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडायची अन् (दि.२९) ऑगस्टला मुंबई गाठायची. आता मागे हटायचे नाही. विजय मिळवायचा, त्याशिवाय मुंबईतून वापस फिरायचे नाही. आता ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल,असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत दिला.
आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवले जायचे. एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही जमला, तुमच्यासमोर नतमस्तक होतो. जातीसाठी किती ताकतीने लढावे, हे सर्व देशाला तुम्ही दाखवून दिले. मराठा समाजाची दोन वर्षापासून संघर्षाची लढाई चालू असून, आता आता मराठ्यांनी जिंकायचे म्हणजे जिंकायचे, असा निर्धारही जरांगेनी यावेळी केला.राजकीय लोक त्यांच्या पक्षासाठी, निवडणुकीसाठी रात्र-दिवस मरमर करतात, मात्र तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी व तुमच्या जातीसाठी कोणीच मरमर करत नाहीत. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी आपल्या लेकराच्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी सज्ज राहा. आता फक्त आठ नऊ टक्केच मराठा आरक्षणामध्ये जायचे राहिला आहेत, हे सरकारलाही माहित आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.