जालना प्रतिनिधी :
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा-भोकरदन रोडवरील डावरगाव पाटीजवळ रविवार (दि.१९) रोजी एका युवकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी केवळ दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावत मामा आणि मावस भाच्याला ताब्यात घेतले आहे. किरकोळ वादातून झालेल्या या हत्येने परिसर हादरला आहे. मृत युवकाचे नाव परमेश्वर सुभाष लोखंडे (वय २६), मूळ रा. चिकलठाणा, ह.मु. पोस्ट ऑफिस परिसर, भोकरदन असे असून, आरोपींमध्ये मामा अनिल विश्वनाथ कांबळे आणि मावसभाऊ अर्जुन रावसाहेब रामफळे यांचा समावेश आहे.
१८ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास तिघे डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील दारूच्या दुकानात एकत्र बसून मद्यपान करत होते. त्यादरम्यान मृत परमेश्वर आणि अर्जुन रामफळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मामा अनिल कांबळे यांनी दोघांना दुचाकीवरून घरी आणले. मात्र वाद वाढत गेला आणि हातघाईत मारहाण झाली. यामध्ये दंडुक्याने झालेल्या मारहाणीत परमेश्वर याचा जागीच मृत्यू झाला.गुन्हा लपविण्यासाठी मामा आणि मावसभाच्याने रात्री दोन वाजेच्या सुमारास मृतदेह क्रूझर गाडीत टाकला आणि वालसा–डावरगाव पाटीजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला. सकाळी ८ वाजता पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आणि तपासाला वेग आला. फक्त दोन तासांत पोलिसांनी मामा व भाच्याला ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलिस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक पवन राजपूत, भास्कर जाधव, दत्ता राऊत, रामेश्वर शिंदकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
मृत परमेश्वर हा मूळचा चिकलठाणा येथील रहिवासी होता. पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेल्याने तो काही दिवसांपासून मामाकडे तर, कधी वालसा डावरगाव येथील बहिणीकडे राहत होता. दरम्यान, तो वारंवार मामा व भाच्याला शिवीगाळ आणि धमक्या देत असल्याने रागाच्या भरात गुन्हा घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.