केज प्रतिनिधी :– अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान व हाताला काम नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? या विवंचनेतून एका सत्तावीस वर्षीय तरूणाने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.०९) आडस येथील सोनवळा रस्त्यालगत घडली. आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव
रवी सिद्धेश्वर आकुसकर (वय-२७) रा. आडस, ता. केज, असे आहे.तालुक्यातील आडस येथील रवी आकुसकर या तरूणाचा शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह भागत नसल्याने बांधकामांवर मिस्त्री म्हणून काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. परंतू अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यात शेतातील उत्पन्न गेल्याने सध्या ग्रामीण भागातील बांधकाम बंद आहेत. शेतीचे झालेले नुकसान व हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा. या नैराश्यातून चिंताग्रस्त असलेल्या रवीने गुरूवारी रात्री आडस शिवारातील सोनवळा रस्त्यालगत असलेल्या गायरानातील पळसाच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. रात्र होऊनही तो घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या भावाच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्याच्या सोबतच्या मित्रांच्या मदतीने गळफास सोडवून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशीर झाल्याने उच्चस्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता आडस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.