*बीडची लेक,बिडचीच सेवा करायला मिळाली असती तर……पंकजाताई मुंडे*
मुंबई (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीयांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकत्व देण्याचा निर्णय घेतला.अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिला दौरा करायच्या आधीच महायुतीतूनच संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचे आम्हाला सहकार्य लाभेलच परंतु माझ्याकडे बीडचे पालकत्व दिले असते तर मला आनंद झाला असता, असे विधान करून भाजप नेत्या, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मनातली इच्छा बोलून दाखवल्यावर मात्र कोणत्याही निर्णयाला माझी असहमती असण्याचे कारण नाही, असे सांगायला देखील त्या विसरल्या नाही.महायुती सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला. दरम्यानच्या काळात कोणते मंत्री मंत्रिमंडळात असावेत, यावरून बराच खल सुरू होता. मंत्र्यांचा विषय मार्गी लागताच खातेवाटपावरून सुंदोपसुंदी सुरू होती. आता सगळे सुरळीत झाले, असे वाटत असतानाच आता पुन्हा पालकमंत्रिपदावरून महायुतीत कुरघोडींना सुरुवात झाली आहे.
*बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद- पंकजा मुंडे यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली*
बीडचे पालकमंत्री तुम्हाला न देता अजित पवार यांना दिले गेले आहे, असे माध्यमांनी पंकजा यांना विचारले. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, कधीही एकसारखेच काम करायला मिळते असे नाही. जसे मागील पाच वर्षे मी पूर्णत: संघटनेचे काम केले. कोणत्याही संविधानिक पदावर मी काम करत नव्हते. राहिला विषय बीडच्या पालकमंत्रिपदाचा तर मी बीडची लेक आहे. जर बीडची सेवा करण्यास मिळाली असती तर मला आनंद झाला असता. बीडकरांना देखील खूप आनंद झाला असता, असे पंकजा म्हणाल्या.
*बीडच्या पालकमंत्रिपदावर आपला ठाम दावा होता, हेच पंकजांनी सुचवले*
बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून माझा पाच वर्षाचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. मी पालकमंत्री असताना बीड जिल्ह्याची वाटचाल विकसनशील जिल्हा म्हणून सुरू होती, असे सांगत बीडच्या पालकमंत्रिपदावर आपला ठाम दावा होता, हेच पंकजा यांनी सुचवले.
*अजितदादा आम्हाला सहकार्य करतील*
तसेच आता जे निर्णय झाले आहेत त्याबद्दल कोणतीही असहमती न दर्शवता मला जे मिळाले, तिथे जास्तीत जास्त काम करेल. संघटना, पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते यांच्याकडहे मला लक्ष द्यावे लागेल. आता अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले आहेत. ते ही आम्हाला पुर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही पंकजा यांनी व्यक्त केला.