अंबाजोगाईतून जाणारा ‘शक्तीपीठ’ महामार्ग होणारचं, काय म्हणाले मुख्यमंत्री ? वाचा…
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
शक्तीपीठ’ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून हा महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या महामार्गाविरोधात मुंबईत आझाद मैदानावर आलेल्या शेतकरी मोर्चाकडे लक्ष वेधलं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडली.
कोल्हापूरमध्ये या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या महामार्गामुळे मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांचं जीवनमान अभूतपूर्व बदलेल, असं सांगत, राज्याच्या विकासाबाबत महत्त्वाच्या असलेल्या या महामार्ग उभारणीसाठी विरोधकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
दरम्यान, हा महामार्ग रद्द न केल्यास, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूरसह 12 जिल्ह्यातले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
‘शक्तीपीठ’ महामार्ग : ‘ही’ देवस्थाने जोडली जाणार
केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड शक्तीपीठ, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा यांचे समाधिस्थान आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.