मुंबई

बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारणार – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची विधिमंडळात घोषणा* *रेल्वे पाठोपाठ विमानतळाचे ही स्वप्न पूर्ण होणार, याचा आनंद, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी मोठी उपलब्धी – धनंजय मुंडे*

 


*माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित दादांसह राज्य शासनाचे मानले आभार*

मुंबई (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात विमानतळ उभारून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधींनी केली असून याबाबतचा प्रस्ताव बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सादर केलेला आहे. बीड जिल्ह्यात सुसज्ज असे विमानतळ उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या कामाला आता गती देण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आज विधिमंडळात घोषित केले.

 

बीड जिल्हा प्रशासनाने मागील काळात याबाबतचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनास संबंधित यंत्रणांकडे सादर केलेला असून, किमान तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने सुसज्ज जागा, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भूसंपादन इत्यादी प्रक्रिया गतीने पूर्ण करून, विमानतळ उभारणीचे काम वेगाने केले जाईल असेही अजित दादा पवार आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हणाले.

 

बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी या घोषणेचे स्वागत केले असून, बीड जिल्हावासियांचे रेल्वे पाठोपाठ आता सुसज्ज अशा विमानतळाचेही स्वप्न पूर्ण होणार असल्याचा आपल्याला मनापासून आनंद आहे. हा निर्णय म्हणजे केवळ बीड साठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी मोठी उपलब्धी असून, बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना याबाबतचा मूळ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारकडे पाठवला होता. बीड जिल्ह्याच्या रेल्वे पाठोपाठ आता विमानतळाचे ही स्वप्न पूर्ण होणार असून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणात देखील विमानतळ उभारण्याची मागणी केली होती. विजयसिंह पंडित यांच्यासह ही मागणी वेळोवेळी केलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींचे हे यश मानावे लागेल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!