मुंबई :-
राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. ओला दुष्काळ कुठेही नाही, शिवाय आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, परंतु ओला दुष्काळ पडल्यानंतर ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (दि.३०) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “६० लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची पैसे वितरीत करण्यास सुरूवात केली आहे. पुढील २ ते ३ दिवसात नुकसानीची सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल. ज्या-ज्या प्रकारचं नुकसान झालं आहे, त्यासंदर्भात मदत करण्यासाठी पुढच्या आठवड्यात घोषणा केली जाईल. दिवळापूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला दुष्काळ मॅन्यूअलमध्ये नाही. परंतू ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती आम्ही देणार आहोत. आता नुकसानीची आकडेवारी जमा होत आहे. पुढच्या आठवड्याच्या आत आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.दिल्लीला प्रस्ताव पाठवावा लागतो, मात्र अजून आकडे जमा होत आहेत. त्यामुळे दिल्लीची वाट न पाहता मदत करण्यास सुरूवात करणार आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी, टंचाईसाठी ‘डीपीडीसी’चा १०% निधी वळवणार
दरम्यान, पूरस्थिती आणि टंचाईच्या काळात तातडीने करावयाच्या मदतकार्यासाठी वेळेत निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण दहा टक्के निधी वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नियोजन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला. या निर्णयामुळे सध्या पूरस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या जिल्ह्यांत हा निधी वापरता येणार आहे.