नागपूर प्रतिनिधी:
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याचा ‘आगडोंग ‘बाहेर पडताच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्याच्या महास्फोटाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शालार्थ आयडी व कर्मचारी भरतीच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकारी श्री नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय एसआयटीची नियुक्ती केल्याबरोबर एसआयटी पथकाने नागपूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभारे व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांची अटक करून शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडून दिली आहे.दरम्यान, शालार्थ आयडी आयडी मध्ये हेराफेरी करून व बोगस शालार्थ आयडी बहाल करून बोगस शिक्षकांची भरती करत उभयतांनी शंभर कोटीपेक्षा जास्तीचा अपहर व भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना नुकतीच एसआयटी पथकाकडून अटक करण्यात आल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात कमालीची खळबळ उडाली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील काळया बाजाराच्या तपासासाठी गठीत ‘एसआयटी’ने नागपूरचे विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभारे यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती:, मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलीस सत्र न्यायालयात ‘रिव्हिजन’ अर्ज दाखल करणार असल्याची ही माहिती उपलब्ध झाली आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशाने नागपूर मध्ये कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी श्री नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी कारवाई असून, राज्यस्तरीय एसआयटी पथकाने केलेल्या या पहिल्याच कार्यवाहीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रीतसर शालार्थ आयडीचे आदेश जारी झालेले नसताना.. मात्र शिक्षण विभागातील काही भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट शालार्थ आयडी तयार केले आणि त्या बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षकांना कोट्यवधी रुपयांचे वेतन अदा करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला आहे. सदर प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर काळुसे हे १६ मार्च २०२४ पासून आजपर्यंत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत,तर रोहिणी कुंभार या २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी होत्या. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही नुक्कतिच अटक केली आहे. पोलिसांची राज्य स्तरावर एसआयटी गठित- शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील सर्व प्रकारच्या तक्रारीची या राज्यस्तरीय एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. आता त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील इतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत या घोटाळ्यात 24 अधिकारी आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्र ही न्यायालयात दाखल झाले आहेत. नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित 3 गुन्हे दाखल झाले आहेत. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिक्षण विभागातल्या या घोटाळ्यात कुठल्याच दोषींना सोडले जाणार नाही आणि या घोटाळ्याचा तपास एसआयटी पथकाने सक्षम पणे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहेत.