उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसची बीड कार्यकारिणी केली बरखास्त
मुंबई (प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही झाल्या नंतर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बीडची कार्यकारिणी बरखास्त करून टाकली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे कनेक्शन उघड झाल्याने पक्षाला मागील महिना भरा पासून बदनामीला सामोरे जावे लागले होते त्यामुळे मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक अजित पवार यांनी घेतली. त्यात त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा फटका धनंजय मुंडे यांना बसणार आहे. कारण सध्या मुंडे यांचा बीड जिल्हा राष्ट्रवादीवर मोठा वरचष्मा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्यावर ‘मकोका’ लावला आहे. तो सध्या केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याचा बचाव करणे आता कठीण झाले आहे. देशमुख यांच्या हत्याप्रकरणात चाटे याचा थेट सहभाग आहे.
त्यामुळे अजित पवार यांनी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी रद्द केली आहे. तरी लाडकी बहीण योजनेच्या तालुका अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड हे कायम आहेत. त्याला अजूनही या पदावरून हटवलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. कराड व त्याचे निकटवर्तीय अजूनही काही समित्यांवर आहेत.
धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट
वाल्मिक कराड याच्याविरोधात विशेष तपास पथकाने (एसआयटी) ‘मकोका’ लावल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अजितदादांनी त्यांना परळीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. परळीत गेल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात आपण प्रसारमाध्यमांशी बोलू, असे मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.