
परळी (प्रतिनिधी) : परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून ही रक्कम मागण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, ऐपत प्रमाणपत्राच्या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रार पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी रक्कम स्वीकारताना तहसीलदारांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमुळे परळी तालुक्यात खळबळ उडाली असून शासकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परळी येथे नियोजनबद्ध सापळा रचला. कारवाई दरम्यान तहसीलदार मुंडे यांस तक्रारदाराच्या हालचालींचा संशय आल्याने त्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीबाबतचे भक्कम तांत्रिक पुरावे संकलित केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या कारवाईमुळे परळी तहसील कार्यालयासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिकांनी एसीबीच्या या धडक कारवाईचे स्वागत केले असून, शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अशा कठोर पावलांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला आहे.
