
परळी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आचार्य टाकळी येथे हुंड्यासाठी तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश डॉ. रचना आर. तेहरा यांनी सोमवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी जगन्नाथ संदीपान आचार्य याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली. तसेच मयत मनीषा हिच्या सासू संजीवनी आचार्य आणि सासरे संदीपान आचार्य यांना छळवणूक व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रत्येकी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या खटल्यात विशेष बाब म्हणजे, खटला मागे घेण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, मयत मनीषाच्या वडिलांनी स्वाभिमानाने ती ऑफर नाकारत तब्बल सहा वर्षे न्यायासाठी लढा दिला. अखेर त्यांच्या संघर्षाला यश मिळाले असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.
प्रकरणाचा तपशील असा की, पाडोळी येथील मनोहर साहेबराव काळे यांची मुलगी मनीषा हिचा विवाह १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आचार्य टाकळी येथील जगन्नाथ आचार्य याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाहावेळी १५ तोळे सोने व संसारोपयोगी वस्तू देऊनही काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ सुरू झाला.
पतीने कार घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली, तर सासू-सासऱ्यांनी किरकोळ कारणांवरून मनीषाचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून आणि सततच्या अत्याचारांमुळे ५ ऑगस्ट २०२० रोजी मनीषाचा मृतदेह तिच्या सासरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.
कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून तिचा खून करण्यात आला होता. मात्र, आरोपींनी मनीषाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. परंतु, मनीषाचे वडील मनोहर काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना मुलीच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. तोंडातून येणारा फेस आणि संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी मुलीच्या हत्येचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालात मनीषाच्या डोक्यात आणि छातीवर अंतर्गत गंभीर जखमा झाल्याचे निष्पन्न झाले, ज्या मारहाणीमुळे झाल्या होत्या. विशेष म्हणजे, ज्यावेळी मनीषाचा अंत झाला, त्यावेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती, तरीही नराधम पतीला तिची दया आली नाही. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम ३०२, ३०४-बी, ४९८-अ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरिक्षक पुरी यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावनी न्या. रचना तेहरा यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकारी अभियोक्ता अॅड. शिवाजीराव मुंडे यांनी या प्रकरणात आठ साक्षीदार तपासले आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा गुन्हा न्यायालयात सिद्ध केला. न्यायालयाने आरोपी पती जगन्नाथ याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, सासरे संदीपान आणि सासू संजीवनी यांना छळ आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी ठोठावण्यात आली. विशेष म्हणे मुख्य आरोपी पती जगन्नाथ हा गुन्हा दाखल झाल्यापासून आजतागायत कारागृहामध्येच आहे.
पित्याचा सहा वर्षांचा लढा यशस्वी
हा खटला केवळ एका गुन्ह्याचा निकाल नसून एका पित्याच्या स्वाभिमानाचा विजय ठरला आहे. माजलगाव येथील साखर कारखान्यात कर्मचारी असलेल्या मनोहर काळे यांना खटला मागे घेण्यासाठी आरोपींकडून एक कोटी रुपयांची मोठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचा सौदा करण्यास त्यांनी ठाम नकार दिला आणि न्यायालयीन लढाई सुरू ठेवली. या निकालामुळे हुंडाबळी घेणाऱ्या आणि विवाहितांचा छळ करणाऱ्या प्रवृत्तींना समाजात एक मोठा संदेश गेला असून, मयत मनीषा आणि तिच्या झगडणाऱ्या पित्याला सहा वर्षांनंतर खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
