*भीमाई नगर येथे भीमजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सध्या देशात एकीकडे जातीयतेचा आणि धर्मांधतेचा विषारी विचार पसरवला जात असताना, दुसरीकडे मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य, समता व न्यायाचे विचार हीच खरी भीमज्योत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त साकूड रोड, भीमाई नगर येथे भीमजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ.राजेश इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती, तर संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.किरण चक्रे व्याख्याते म्हणून लाभले होते. यावेळी बोलताना डॉ.इंगोले म्हणाले की, आज समाजात द्वेषाचे, असमानतेचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. अशावेळी बाबासाहेबांची भीमज्योत म्हणजेच शिक्षण, समता आणि विज्ञानवादी दृष्टिकोन, अन्यायाविरोधात लढा तेवत ठेवणे हीच खरी भीमजयंती. जोपर्यंत ही भीमज्योत तेवत राहील, तोपर्यंत जातीयतेचा आणि धर्मांधतेचा अंधार मानवी मूल्यांना पराभूत करू शकणार नाही. त्यांनी तरूणांना बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्रानुसार वाटचाल करत शासनकर्ती जमात बनण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. व्याख्याते प्रा.डॉ.किरण चक्रे यांनी डॉ.आंबेडकरांचे संरक्षण क्षेत्र आणि राष्ट्र उभारणीतील योगदान यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज भारताला महासत्ता बनविण्यासाठी कसे मोलाचे आहेत, हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाला भीमाई नगर परिसरातील नागरिक, महिला व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरूवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ.राजेश इंगोले, प्रा.डॉ.किरण चक्रे व जयंती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल जोगदंड, राहुल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक भीमवंदना घेण्यात आली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे मौलिक विचार यावर व्याख्याने सादर केली. या व्याख्यात्या विद्यार्थ्यांचा डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते सत्कार करून पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गायकवाड व वैदेही वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रशांत पोटभरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल जोगदंड, उपाध्यक्ष मंगेश दासूद, कोषाध्यक्ष सुमित साळवे, तुकेश कचरे, प्रशांत पोटभरे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
