अंबाजोगाई प्रतिनिधी : : अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीचा वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारुड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून असहाय्य झालेल्या पत्नीने सुरुवातीला पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला होता, मात्र अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा खोटा बनाव उधळला गेला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा येथील रहिवासी शरीफ पठाण हे नेहमी दारू पिऊन घरी येऊन पत्नी नसरीन पठाण यांच्याशी वाद घालत असत. घटनेच्या रात्री देखील पती दारूच्या नशेत सतत त्रास देत असल्याने आणि घरात वाद विकोपाला गेल्याने, अत्यंत असहाय्य झालेल्या नसरीन यांनी रागाच्या भरात घरातील काळ्या वायरने शरीफ यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले. या कृत्यानंतर त्यांनी घाबरून पतीला ‘हार्ट अटॅक’ आल्याचा आणि ते हालचाल करत नसल्याचा बनाव रचत नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रात्रीच शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शरीफ यांना मृत घोषित केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा नसरीन यांचा प्रयत्न होता.

मात्र, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी मृतदेह पाहताच त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून मृतदेहाच्या गळ्याभोवती असलेले काळसर व्रण आणि अंगावरील ओरखडे सुटले नाहीत. संशय आल्याने त्यांनी नसरीन यांची कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातही गळा आवळल्यानेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मृत शरीफ यांचा २४ वर्षीय मुलगा साहील शरीफ पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी आई नसरीन शरीफ पठाण हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३ आणि ११५(२) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधवर हे करत आहेत.
आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी नसरीन शरीफ पठाण हिला अटक केली. मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस निरीक्षक खोकले यांच्यासमवेत पीएसआय रहीम चौधरी, पोलीस कर्मचारी कल्याण देशमाने, सिद्धेश्वर, राहुल भोसले, बासर यांनी परिश्रम घेतले.
