
बीड प्रतिनिधी :–शहरातील पालवन चौक परिसरात सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, लॅपटॉप, की-बोर्ड व माऊस असा एकूण १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांना शुक्रवारी (दि.९) गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,पालवन चौक येथील मधुबन बिअर बारसमोरील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये काही जण संगणकाच्या माध्यमातून पैशांवर चक्री नावाचा जुगार खेळत आहेत. यावरून घटनास्थळी छापा टाकला.दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली असता काही जुगारी पोलिसांना पाहून पसार झाले.मात्र,राहुल सुधाकर हजारे (वय-३०,रा.गोविंद नगर,धानोरा रोड, बीड) हा इसम घटनास्थळी आढळून आला. चौकशीदरम्यान तो लोकांकडून पैसे घेऊन चक्री जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ३ हजार २०० रुपये रोख, कॉम्पॅक कंपनीचा लॅपटॉप, विप्रो कंपनीचा की-बोर्ड आणि लॅपकेअर कंपनीचा माऊस असा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी राहुल हजारे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन आगलावे,रविंद्र आघाव यांनी केली.
