अंबाजोगाई प्रतिनिधी : शहरातील एसआरटी रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलाच्या कर्मचाऱ्यांकडून ॲड. इस्माईल गवळी तसेच एका ऑटोचालकास बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून हा प्रकार घडला. वाद वाढत गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेत ॲड. इस्माईल गवळी व संबंधित ऑटोचालक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी संबंधित सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, रुग्णालय परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
