अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे मंगळवारी सायंकाळी अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली. शौचास गेलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित चिमुकली मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घराजवळील परिसरात शौचास गेली असता, तिच्या शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार चिमुकलीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला होता; मात्र प्रकरण वाढू नये या भीतीने कुटुंबाने सुरुवातीला शांतता बाळगली.
दरम्यान, बुधवारी सकाळी चिमुकलीला त्रास जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. त्यानंतर याबाबत बर्दापूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(२) तसेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे करत आहेत.
अल्पवयीनांकडून गुन्ह्यांत वाढ चिंताजनक
अलीकडील काळात अंबाजोगाई तालुक्यासह इतर भागांत अल्पवयीनांकडून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून अशा मुलांचे समुपदेशन, पालकांची जागरूकता आणि सामाजिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे.
