केज (प्रतिनिधी) : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अचानक ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ते कारमध्ये एकटेच असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. एका कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या आकस्मिक निधनामुळे महसूल विभागासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
