केज प्रतिनिधी :
विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी केज येथे उपोषण सुरू असताना धक्कादायक घटना घडली. उपोषणस्थळी बसलेल्या विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याच्या निषेधार्थ कुटुंबीयांकडून उपोषण करण्यात येत आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, उपोषणस्थळीच सुषमा घुले यांनी विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या प्रकरणात प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
