माजी पोलीस आयुक्त व विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य सदस्यपदी निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या कार्यगटांच्या रचनेत महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यासंदर्भात १० ऑगस्ट २०२६ रोजी कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्र अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या कार्यगट क्रमांक ४ आणि कार्यगट क्रमांक ५ यांच्या रचनेत बदल करण्यात आला आहे.
कार्यगट क्रमांक ४ मध्ये चंद्रकांत दळवी यांची प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे
गट-क व अराजपत्रित गट-ब पदांच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी असलेल्या कार्यगट क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. डॉ. प्रमोद शिंदे आणि श्री. दिनेश दळवी यांच्या जागी पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचा प्रमुख म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या कार्यगटात मित्रचे संचालक विवेक दहिफळे आणि मिलिंद कुलकर्णी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय या कार्यगटाची व्याप्ती केवळ ‘गट-क पदे’ इतकी मर्यादित न ठेवता ‘गट-क व अराजपत्रित गट-ब पदे’ अशी विस्तारित करण्यात आली आहे.
कार्यगट क्रमांक पाच मध्ये अंकुश शिंदे यांचा समावेश
पोलीस, नियामक व प्रादेशिक परिवहन सेवांशी संबंधित स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रम पुनरावलोकनासाठी गठीत करण्यात आलेल्या कार्यगट क्रमांक पाच मध्ये माजी पोलीस आयुक्त व विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेऊन तो अधिक अद्ययावत, उपयुक्त आणि पदांच्या स्वरूपाशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने या कार्यगटांकडून काम केले जाणार आहे. शासनाच्या आदेशातील इतर सर्व अटी व शर्ती या दोन्ही कार्यगटांना लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
