आहिल्यानगर : राज्यातील शेतकरी आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी साईबाबा संस्थान पुढे सरसावले आहे. आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाती विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, १० वीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ११ वी आणि १२ वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे.
आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची असलेली CET ची फी देखील साईबाबा संस्थान भरणार आहे. भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सुविधा सुरू करण्याची तयारी संस्थानने केली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना मठा दिलासा मिळणार आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी हे भारतातील एक प्रमुख आणि श्रीमंत देवस्थान आहे. जे साईबाबांच्या समाधी मंदिराचे व्यवस्थापन करते. ‘सबका मालिक एक’ ही शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक येथे येतात. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी समाधी घेतलेल्या साईबाबांचे हे स्थान ‘श्रद्धा आणि सबुरी’चे प्रतीक मानले जाते. साईभक्तांकडून मिळणारी देणगी हे संस्थानाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. प्रत्येक दिवशी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणातच भाविका दाखल होत असतात. महाराष्ट्रातूनच नाहीतर देशभरातून आणि जगभरातून भाविका साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दरवर्षी येत असतात. मोठ्या मनोभावे ते देवाची पूजाअर्चा करतात. त्याबरोबर मोठ्या प्रमाणात देणगी देखील साई संस्थानला भाविक देत असतात. महाराष्ट्रातील काही श्रीमंत देवस्थानापैकी साईबाबा देवस्थान हे एक आहे.
साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात
दरम्यान, सातत्याने साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर समाजउपयोगी कामं देखील केली जातात. आरोग्याच्या बाबातीत देखील साईबाबा संस्थानच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत तसेच उपचार केले जातात. शिक्षणासाठी देखील गरजू विद्यार्थ्यांना साईबाबा संस्थानच्या माध्यमातून मदत केली जाते.
