अंबाजोगाई प्रतिनिधी :
अंबाजोगाई शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्त्यावरील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाई शहर पोलिसांनी विशेष वाहतूक मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली.
आज सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.०० वाजेदरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथागत चौक व बसस्थानक परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच वारंवार सूचना देऊनही तथागत चौक परिसरातील हॉटेलसमोर रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंग करण्यात आलेली वाहने आढळून आल्याने एकूण ३० वाहने पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
सदर मोहिमेत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रमेश घुले, रमेश सानप, भागवत कांदे तसेच पोलीस अमलदार मंगेश भोळे,पोलीस अंमलदार बाळासाहेब पारवे, श्रीकृष्ण वडकर, भगवान नागरगोजे, बिभीषण मुंडे, अनिल डोंगरे, निलेश भोसले, तेजस वावळे, हनुमंत लाड, त्र्यंबक फड, अजय गडदे, सुशांत गायकवाड, संदीप मुंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, खरेदीसाठी अथवा हॉटेलमध्ये जाताना वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी न करता नियोजित ठिकाणी किंवा वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पार्क करावीत. तसेच हॉटेल चालक व व्यावसायिकांनी ग्राहकांच्या वाहनांसाठी शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.
शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारची विशेष वाहतूक मोहीम दररोज बदलत्या ठिकाणी सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या कडून देण्यात आली.
