अंबाजोगाई प्रतिनिधी:-
अंबाजोगाई शहरातील ट्युशन परिसरात बारावीच्या विद्यार्थ्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन प्रौढ आरोपींसह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीर जखमी विद्यार्थ्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष विनोद माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या माळीनगर, अंबाजोगाई) हा अभ्यासिका संपवून पायी आपल्या राहत्या खोलीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीने त्याला अडवले. यावेळी शिवीगाळ करत एका आरोपीने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. हल्ल्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी आशिषला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही प्रौढ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे अंबाजोगाईतील ट्युशन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्या भागात नियमित पोलीस गस्त वाढविणे तसेच गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
