अंबाजोगाई प्रतिनिधी :-
अंबाजोगाई शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील वडार कॉलनी येथील सर्वसामान्य कुटुंबातील युवक उमेश रमेश देवकर याने स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अग्निवीर भरतीत यश मिळवत अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
उमेशचे वडील टिप्पर चालक (ड्रायव्हर) असून अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून तो पुढे आला आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो प्लंबरचे काम करत असतानाच अग्निवीर भरतीची तयारी करत होता. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी अकॅडमीचा आधार न घेता स्वतःच्या मेहनतीवर त्याने हे यश संपादन केले.
उमेशने दहावीपर्यंतचे शिक्षण नेताजी माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे, तर अकरावी-बारावीचे शिक्षण खोलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे पूर्ण केले. खोलेश्वर विद्यालयात घेतलेल्या NCC प्रशिक्षणाचा त्याला मोठा फायदा झाला आणि त्याच प्रशिक्षणाच्या बळावर त्याने अग्निवीर भरतीत यशस्वी मजल मारली.
उमेश देवकरच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण वडार कॉलनी आणि अंबाजोगाई शहरातून त्याचे कौतुक होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महाराष्ट्र वार्ता न्यूजकडून उमेश रमेश देवकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
