बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील एका अधिकाऱ्याला तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
श्रीनिवास लखमवाड असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सन २०२५–२६ मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करून देणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी त्यांनी ४५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारदाराने २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. त्यावेळी श्रीनिवास लखमवाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान ५ लाख रुपये अस्सल नोटा आणि उर्वरित मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या (डमी/खोट्या) नोटा स्वीकारताना एसीबीने त्यांना पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास छत्रपती संभाजीनगर एसीबी करत आहे.
