मुलींची छेड काढल्याचा संशय घेत ग्रामपंचायत कार्यालय व शाळेच्या पटांगणात मारहाण केल्याचा आरोप
अंबाजोगाई प्रतिनिधी : धानोरा बुद्रुक येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मुलींची छेड काढल्याच्या संशयातून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या घटनेनंतर २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मयत तरुणाच्या भावाच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत किरण रमेश दहिभाते (वय २६, रा. धानोरा बुद्रुक) हा ग्रामपंचायत कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात काम करत होता. त्याचा भाऊ रवी रमेश दहिभाते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल व्यंकटी पांडे, काकासाहेब व्यंकटी पांडे, बप्पासाहेब व्यंकटी पांडे आणि श्रीकांत संपत गोरे (सर्व रा. धानोरा बुद्रुक) यांनी किरणला ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन मुलींची छेड काढल्याचा संशय घेत लाथाबुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली.
यानंतर किरणला जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात नेऊन दगडाने मारहाण करण्यात आली. यावेळी किरण व त्याचा भाऊ रवी यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर झालेल्या मारहाणीमुळे व अपमानामुळे किरण मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चारही आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे (आयपीएस) करीत आहेत.
