अंबाजोगाई प्रतिनिधी : पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाटनांदूर येथे घडली. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या चार जणांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील व्यापारी रोहीत अशोक फुलारी यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. रोहीत यांची लहान बहीण दीक्षा (वय ३१) हिचा विवाह जून २०२० मध्ये घाटनांदूर येथील अजित बापुराव फुलारी याच्याशी झाला होता. लग्नात १२ लाख रुपये आणि ११ तोळे सोने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते. अजितला लवकरच स्टेनोची नोकरी लागणार असल्याचे लग्नाआधी सांगण्यात आले होते, त्यामुळे दीक्षाचे लग्न अजित सोबत लावून देण्यात आले. मात्र, त्याला नोकरी लागली नाही. लग्नाच्या एका वर्षानंतर पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा सासरच्यांनी दीक्षाकडे लावला. यावरून तिला टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, उपाशी ठेवणे, बेदम मारहाण करणे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करणे सुरू होते. या सततच्या जाचाला कंटाळून दीक्षाने राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.या प्रकरणी आरोपी पती अजित बापुराव फुलारी, सासू सत्यभामा उर्फ चंचला बापुराव फुलारी, सासरे बापुराव लक्ष्मण फुलारी आणि नणंद शुभांगी उर्फ सोनी नामदेव फुलारी सर्व रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. संतोष जाधवर करत आहेत.
