अंबाजोगाईतील किशोर जाधववर MPDAची कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी
अंबाजोगाई प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंदे, दारूविक्री आणि समाजकंटकांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच मोहिमेअंतर्गत अंबाजोगाई शहर पोलिसांनी हातभट्टीच्या दारूच्या अवैध व्यवसायात सक्रिय असलेल्या किशोर बाबराव जाधव (वय 39, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधविक्रेते, धोकादायक व्यक्ती व अंमली पदार्थ तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम (MPDA) अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांच्यामार्फत सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. या प्रस्तावास दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंजुरी दिली. त्यानंतर पोलिसांनी किशोर जाधव यास 12 सप्टेंबर 2026 रोजी ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
सहा गुन्ह्यांची नोंद; प्रतिबंधक कारवाईलाही जुमानला नाही
स्थानबद्ध करण्यात आलेल्या किशोर जाधव याच्याविरुद्ध हातभट्टीची दारू तयार करणे, ताब्यात बाळगणे, वाहतूक करणे आणि विक्री करणे आदी प्रकारांबाबत महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमांतर्गत सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याशिवाय त्याच्याविरुद्ध 16 ऑगस्ट 2025 रोजी कलम 93 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतरही त्याच्या अवैध कारवायांमध्ये अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ताव सादर केला.
गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि अवैध धंद्यांना आळा बसावा, या उद्देशाने पोलिसांकडून अशा समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट इशारा
दरम्यान, भविष्यात वाळूचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटखा विक्री करणारे, जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक, दादागिरी व खंडणी करणारे धोकादायक गुंड, बेकायदेशीर जुगार व लॉटरी व्यवसाय करणारे तसेच हातभट्टीच्या दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
अशा व्यक्तींवर परिस्थितीनुसार MPDA तसेच MCOCA कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भापोसे) यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभाग अंबाजोगाई तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, रमेश घुले, पोलीस हवालदार श्रीकृष्ण वडकर, मंगेश भोले, अनिल डोंगरे, संतोष गाडे, हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोउपनि अभिमन्यू औताडे, सचिन सानप, सचिन आंधळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, बबन सलगर आणि बिबीषण चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गणेशोत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी बीड जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
