अंबाजोगाई प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेलमध्ये झालेल्या विलास घुले याच्या निर्घण हत्या प्रकरणाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. “वाल्मिक कराड हा तुरुंगातून फोन करून माझ्या मुलाला — सौरभ सोनवणे याला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्याचे आदेश देत आहे,” असा खळबळजनक दावा खासदार सोनवणे यांनी केला आहे.
आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग देखील प्रसिद्ध केली. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मीक कराड तुरुंगातूनच आपल्या माणसांशी फोनवर बोलत असून, विलास घुलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्याचे आदेश देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत असल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
केज तालुक्यातील टाकळी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये विलास घुले याची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १० आरोपींना गजाआड केले आहे. मात्र, या हत्येमागे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा हात असल्याचा आरोप सातत्याने विलास घुले यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. या मागणीसाठी नातेवाईकांनी विविध आंदोलनेही केली असून, सौरभ सोनवणेचा ‘सीडीआर’ (Call Detail Record) काढण्याची मागणी लावून धरली आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका
दुसरीकडे, विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणे याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नसल्याचे पोलीस प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही राजकीय सूडबुद्धीतून आणि तुरुंगातून सूत्रे हलवून आपल्या मुलाला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
या कथित ऑडिओ क्लिपमुळे बीडच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आता पोलीस प्रशासन या ऑडिओ क्लिपवर आणि तुरुंगातील फोन संभाषणावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
