२६ नोव्हेंबरच्या पुणे बैठकीत डॉ. आदित्य पतकराव मांडणार दोन पर्यायी रेल्वे मार्गांचे प्रस्ताव; घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गालाही गती देण्याची मागणी
अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाईला रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळावे, हे अनेक दशकांपासूनचे स्वप्न आता नव्या आशेने पुढे येत आहे. या प्रश्नासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आदित्य दगडू पतकराव यांनी पुढाकार घेतला असून, येत्या २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंबाजोगाईसाठी रेल्वे जोडणीचे तीन पर्याय मांडण्याची तयारी केली आहे. यामध्ये २०१६ मध्ये मंजूर झालेल्या घाटनांदूर–श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षणाला गती देण्यासह दोन पर्यायी रेल्वे मार्गांचा समावेश आहे.
मात्र, या रेल्वे स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता केवळ प्रस्ताव पुरेसा नाही, तर राजकीय इच्छाशक्ती आणि लोकप्रतिनिधींच्या ठोस पाठपुराव्याचीही आवश्यकता आहे. विशेषतः बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांची भूमिका या टप्प्यावर अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
दोन पर्यायी मार्ग; अंबाजोगाईच्या विकासाला नवी संधी!
घाटनांदूर–श्रीगोंदा रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अपेक्षित गती मिळत नसल्यास अंबाजोगाईला रेल्वेने जोडण्यासाठी पर्यायी मार्गांचाही गांभीर्याने विचार व्हावा, अशी भूमिका डॉ. पतकराव मांडणार आहेत.
प्रस्तावित दोन पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
१. परळी वैजनाथ–अंबाजोगाई–मुरुड (MRX).
२. परळी वैजनाथ–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–बार्शी.
या दोन्ही मार्गांची तांत्रिक व्यवहार्यता, अंतर, संभाव्य खर्च आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीची क्षमता तपासून योग्य पर्याय निश्चित करावा, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–बार्शी हा प्रस्तावित मार्ग बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाथरा येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या परिसरातून जाण्याची शक्यता असल्याने या मार्गासाठी खासदारांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांच्यासाठी ही संधी!
अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नाला आता केवळ स्थानिक मागणी म्हणून न पाहता, संपूर्ण बीड जिल्ह्याच्या दळणवळण आणि विकासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
डॉ. आदित्य पतकराव हे रेल्वेच्या विविध स्तरांवर या प्रश्नाचा पाठपुरावा करत असताना आता खासदार बजरंग सोनवणे यांनीही रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाच्या स्तरावर हा विषय प्रभावीपणे मांडणे आवश्यक आहे.
विशेषतः त्यांच्या पाथरा येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या परिसरातून संभाव्यतः जाणाऱ्या परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–बार्शी मार्गासाठी त्यांनी प्राधान्याने पाठपुरावा केल्यास या प्रस्तावाला नवी ताकद मिळू शकते.
खासदारांनी या पर्यायी मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षणाची मागणी करावी, रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा आणि आवश्यक असल्यास लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी, अशी अपेक्षा अंबाजोगाईकरांकडून व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
डॉ. पतकराव यांनी प्रस्ताव मांडायचा, तर त्याला राजकीय बळ देण्याची जबाबदारी खासदार सोनवणे यांनी स्वीकारायची; अशी लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रश्नासाठी झटणाऱ्या व्यक्तींची समन्वयाची भूमिका निर्माण झाली, तर अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नाला निश्चितच नवी दिशा मिळू शकते.
रेल्वे मंत्र्यांकडेही यापूर्वी पाठपुरावा
अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नासाठी डॉ. पतकराव यांनी यापूर्वी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची भेट घेऊन नवीन रेल्वे स्टेशनची मागणी केली होती. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.
२६ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक
मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून डॉ. पतकराव यांना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण मिळाले आहे. पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.
या बैठकीत अंबाजोगाईसाठी रेल्वे स्टेशन आणि रेल्वे जोडणीचे प्रस्ताव मांडले जाणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अंबाजोगाईला रेल्वे मिळाली तर विकासाची नवी दारे उघडतील!
अंबाजोगाई हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक आणि व्यापारी केंद्र आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, योगेश्वरी मंदिर तसेच विविध शैक्षणिक संस्थांमुळे येथे राज्याच्या विविध भागांतून नागरिक येतात. मात्र, थेट रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांना रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते.
अंबाजोगाई रेल्वेने जोडले गेल्यास वैद्यकीय सेवा, शिक्षण, व्यापार, पर्यटन, कृषी मालाची वाहतूक आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळू शकते.
आता निर्णयाची वेळ लोकप्रतिनिधींची!
अंबाजोगाईच्या रेल्वे मागणीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गाचा प्रस्ताव, परळी–अंबाजोगाई–मुरुड हा पर्याय आणि परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–बार्शी हा पर्यायी मार्ग अशा विविध शक्यता आता चर्चेत येत आहेत.
डॉ. आदित्य पतकराव यांनी २६ नोव्हेंबरच्या बैठकीत हे प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांचा सातत्याने पाठपुरावा होणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी पुढाकार घेऊन रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डापर्यंत हा प्रश्न पोहोचवावा, हीच अंबाजोगाईकरांची अपेक्षा आहे.
प्रश्न आता अंबाजोगाईला रेल्वे मिळावी एवढाच राहिलेला नाही; तर रेल्वे जोडणीसाठी उपलब्ध पर्यायांपैकी कोणता मार्ग व्यवहार्य ठरू शकतो आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कोण पुढाकार घेणार, हा आहे. २६ नोव्हेंबरची बैठक अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नाला नवी दिशा देणारी ठरते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
