दिवाळीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जप्त सायलेंसर केले जमीनदोस्त; ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांचा कडक इशारा
अंबाजोगाई प्रतिनिधी :
अंबाजोगाई शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांना शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण मिळावे, यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात दुचाकींना मोठ्या आवाजाचे कर्णकर्कश सायलेंसर बसवून गल्ली-बोळांतून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या ८० हून अधिक बेकायदेशीर सायलेंसरचा चक्क रोड रोलरखाली चुराडा करण्यात आला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा अनोखा आणि लक्षवेधी उपक्रम राबविण्यात आला.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी स्वीकारल्यापासून शहरातील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी शिस्तभंग करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही दुचाकीस्वार आपल्या वाहनांना मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसवून भरधाव वेगाने गल्लोगल्ली फिरत होते. या वाहनांमधून निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, महिला, लहान मुले तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी या आवाजामुळे नागरिकांच्या शांततेचा भंग होत होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ८० हून अधिक मोठ्या आवाजाचे सायलेंसर जप्त केले.

दिवाळीच्या मुहूर्तावर सायलेंसरचा कायमचा बंदोबस्त!
जप्त केलेल्या या सायलेंसरचे काय केले जाणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. अखेर दिवाळीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौक या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी रोड रोलरच्या साहाय्याने या सायलेंसरचा अक्षरशः चुराडा केला. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेंसरविरोधात केलेली ही प्रतीकात्मक कठोर कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत!
ध्वनीप्रदूषण हा केवळ त्रासदायक प्रकार नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि सार्वजनिक शांततेशी निगडित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अंबाजोगाईकरांनी स्वागत केले असून, शहरात शांतता आणि शिस्त राखण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मोठा आवाज करून शहरातील शांतता भंग करणाऱ्यांनो सावधान! अंबाजोगाई पोलिसांचा इशारा आता केवळ कारवाईपुरता मर्यादित नसून, थेट सायलेंसरच्या चुराड्यापर्यंत पोहोचला आहे!
