अंबाजोगाई शहर पोलिसांची तत्पर पोलिसिंग; सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने बर्दापूर परिसरातून पर्स हस्तगत
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
प्रवासादरम्यान झालेल्या गडबडीत हरवलेली सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू असलेली पर्स अंबाजोगाई शहर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने शोधून काढत संबंधित महिलेला सुखरूप परत केली. तब्बल २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल परत मिळाल्याने महिलेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलिसांचे मनापासून आभार मानले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासाच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ही कामगिरी ठरली आहे.
पूजा गजानन भांगरे, रा. सोलंकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर या दिवाळी सणानिमित्त अंबाजोगाई येथे त्यांचे वडील गोवर्धन दादासाहेब भुसारे यांच्याकडे आल्या होत्या. दिवाळी सण साजरा करून त्या पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्या असताना अंबाजोगाई बसस्थानकावर बसमध्ये चढण्याच्या घाईगडबडीत त्यांची दागिने आणि मौल्यवान वस्तू असलेली पर्स बसस्थानकातच विसरून राहिली.
काही वेळानंतर पर्स हरवल्याचे लक्षात येताच पूजा भांगरे यांनी पतीसह तातडीने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनमुळे तपासाला दिशा!
पोलिसांनी सर्वप्रथम अंबाजोगाई बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये अंदाजे ८० ते ८५ वर्षे वयोगटातील एका व्यक्तीने सदर पर्स उचलल्याचे निदर्शनास आले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते.
त्यानंतर पोलिसांनी पर्समधील मोबाईल फोनचे लोकेशन तांत्रिक पद्धतीने तपासले असता ते बर्दापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजमधील माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशी यांच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
यानंतर पोलिसांनी तातडीने बर्दापूर परिसरात जाऊन संबंधित वयोवृद्ध व्यक्तीकडून हरवलेली पर्स हस्तगत केली. पर्समधील सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली.
सदर पर्समध्ये खालील मौल्यवान वस्तू होत्या.
१. मिनी गंठण (१ तोळा) – १ लाख ४५ हजार रुपये
२. मिनी मंगळसूत्र (४ ग्रॅम) – ५६ हजार रुपये
३. बदाम (अर्धा ग्रॅम) – ७ हजार रुपये
४. कानातील दागिने (४ ग्रॅम) – ५६ हजार रुपये
५. मोबाईल – २० हजार रुपये
६. स्मार्ट वॉच – २ हजार रुपये
७. साधे घड्याळ – ५०० रुपये.
एकूण मुद्देमाल : २ लाख ८६ हजार ५०० रुपये सुखरूप परत
आज सदर पर्स आणि त्यातील संपूर्ण मुद्देमाल पूजा गजानन भांगरे यांना अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे परत करण्यात आला. हरवलेले मौल्यवान दागिने आणि साहित्य पुन्हा सुरक्षितपणे मिळाल्याने पूजा भांगरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे विशेष आभार मानले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री. समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या तपासात पोलीस हवालदार बदाम आरसूळ आणि पोलीस नाईक तेजस वावळे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नागरिकांनी प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी : पोलिसांचे आवाहन
बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना नागरिकांनी आपले दागिने, मोबाईल, पर्स आणि इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही कारणास्तव साहित्य हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास विलंब न करता जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांना तातडीने तपास करणे शक्य होते.
अंबाजोगाई शहर पोलिसांनी दाखविलेली ही तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता कौतुकास्पद असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असल्याचा विश्वास या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.
बीड पोलीस – सदैव जनतेच्या सेवेत!
