अंबाजोगाई प्रतिनिधी : तालुक्यातील हाडबेवाडी येथे मजुरी करून संसार चालवणाऱ्या कुटुंबाच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सायस धोंडिबा गायकवाड (वय ६०, रा. हाडबेवाडी) हे आपल्या पत्नीसह मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ते परळी येथे मुलीकडे गेले होते. दोन दिवसांनंतर १३ एप्रिल रोजी सकाळी गावातील एका तरुणाने त्यांच्या घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. गायकवाड दाम्पत्य तातडीने परतले असता घरातील कुलूप तुटलेले व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.
चोरट्यांनी धान्याच्या कोठीत ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये, गादीखालील १ लाख ४० हजार रुपये आणि बचत गटाचे ५० हजार रुपये अशी एकूण ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याशिवाय सुमारे ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही लंपास करण्यात आले.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले हे पुढील तपास करत आहेत.
