अंबाजोगाई (प्रतिनिधी):
उदगीर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथून उपस्थित राहिलेल्या पत्रकार व प्रतिनिधींचा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये स्नेहबंध दृढ होण्यासोबतच विचारांची देवाणघेवाण करण्यास एक उत्तम व्यासपीठ मिळाले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्राध्यापक कंगळे सर, मातेकर सर तसेच इतर शिक्षकांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी पत्रकारिता क्षेत्रातील बदलते प्रवाह, सामाजिक जबाबदाऱ्या तसेच वर्तमान घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार पुनम परदेशी (दै. परळी प्रहार), मुशीर बाबा (दै. जगमित्र), वासुदेव शिंदे (दै. चंपावती पत्र), कुलकर्णी एम. (आकाशवाणी औरंगाबाद), मातेकर (तरुण भारत), दत्तात्रेय अंबेकर (दै. झुंजार नेता), विरेंद्र गुप्ता (बीड संकेत), संजय रानभरे (दै. सकाळ), सय्यद नयीम (रण झुंजार), अशोक दळवे (दै. अतुल्य महाराष्ट्र), प्रशांत मस्के (दै. बीड सत्ता), व्यंकटेश जोशी (दै. न्याय टाइम्स) आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत पत्रकारितेतील अनुभव शेअर केले. स्नेहपूर्ण वातावरणात सर्वांनी एकत्र येत छायाचित्र टिपत हा क्षण संस्मरणीय केला.
हा सत्कार सोहळा केवळ औपचारिक न राहता पत्रकारांमधील ऐक्य, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा ठरला.
