अंबाजोगाई अशोक दळवे :
अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील रहिवासी रेखा युवराज क्षीरसागर यांचे सुमारे ₹2 लाख 25 हजार किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या तत्परतेमुळे पुन्हा मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा क्षीरसागर या दि. 2 जून 2026 रोजी सकाळी लोखंडी सावरगाव येथून शिवाजी चौकाकडे ऑटो रिक्षाने प्रवास करत होत्या. ऑटोमध्ये बसण्याच्या घाईत त्यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी शिवाजी चौक येथील ऑटो पॉईंटजवळ खाली पडली. मात्र त्यांना याची जाणीव न झाल्याने त्या पुढे निघून गेल्या.
दुसऱ्या दिवशी त्यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक व्यक्ती सदरची पिशवी उचलून घेऊन जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्या व्यक्तीची ओळख खंडू अंबादास साळवे (वय 65, रा. भीमनगर, मांडवा रोड, परळी वेस अंबाजोगाई अशी पटवली.
पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी प्रामाणिकपणे पिशवी आपल्या ताब्यात असल्याचे सांगून ती पोलिसांकडे सुपूर्द केली. पिशवीमध्ये 56 मणी, दोन सोन्याचे पिळ्याचे पेंडल आणि दोन सोन्याचे झुंबर असे सुमारे दीड तोळे वजनाचे व अंदाजे ₹2.25 लाख किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले.
त्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या हस्ते सदरचे दागिने रेखा क्षीरसागर यांना परत करण्यात आले. हरवलेले मौल्यवान दागिने अल्पावधीत शोधून काढण्यासाठी पोलीस हवालदार पांडुरंग काळे व पोलीस अंमलदार हनुमंत चादर पोलीस हवालदार नागरगोजेयांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून संबंधित व्यक्तीचा शोध घेत मोलाची कामगिरी बजावली.
या प्रकरणात प्रामाणिकपणा दाखवत दागिन्यांची पिशवी सुरक्षित ठेवून ती पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या खंडू अंबादास साळवे यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
