अंबाजोगाई प्रतिनिधी :- येथील बस डेपो जवळील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या एका एटीएम केंद्रात शिरून अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनची तोडफोड करत रोकड पळवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मशीनचे कव्हर आणि लॉक तोडले, मात्र एटीएममधील रोकड सुरक्षित असून चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एटीएम मशीनशी छेडछाड होत असल्याचा अलर्ट कंपनीच्या मॅनेजरला मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला. एटीएम केंद्राची पाहणी केली असता, अज्ञात चोरांनी रोकड चोरण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनचे बाह्य कव्हर आणि लॉक तोडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याचे दिसून आले. मात्र, चोरांना मशीनमधील रोख रक्कम चोरण्यात यश आले नाही. कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह भिमराव अंबादास बलखंडे यांनी तात्काळ अंबाजोगाई येथे येत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, ज्यामध्ये दोन अज्ञात इसम तोडफोड करताना स्पष्ट दिसले.
याप्रकरणी भिमराव बलखंडे यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
