पिंक पथकाकडे तपास वर्ग; आरोपीला न्यायालयात हजर करणार
अंबाजोगाई, (प्रतिनिधी) :
अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी २४ वर्षीय तरुणास अटक केली आहे. रीतीक देवदत्त चौधरी (वय २४, रा. मोची गल्ली, अंबाजोगाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराची असून, दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री आरोपीने तिला मोबाईलवरून संपर्क साधून बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यान्वये कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी हा गुन्हा पिंक पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेंडगे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपी रीतीक चौधरी यास अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही भांडणासह अन्य स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असून, परिसरात त्याच्याविषयी दहशतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. मोची गल्ली परिसरात काही टवाळखोर तरुणांकडून नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीही स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी अधिक प्रभावी गस्त वाढवून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पीडित अल्पवयीन मुलीची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.
