अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाईचे सुपुत्र तथा धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. परभणीचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. रवींद्रनाथ चव्हाण यांची सातारा येथे बदली झाल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
डॉ. रवींद्रनाथ चव्हाण यांची परभणी येथून सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी येथील अधिष्ठाता पद रिक्त झाले होते. या रिक्त पदाचा कार्यभार आता डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सुपूर्द करण्यात आला आहे. डॉ. विश्वजित पवार हे सध्या धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून तेथील जबाबदाऱ्यांसह ते आता परभणीचा अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत. या नव्या प्रशासकीय बदलामुळे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाला योग्य दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
