बीड प्रतिनिधी :– तालुक्यातील कुटेवाडी येथे एका २३ वर्षीय नवविवाहितेचा विहीरीत मृतदेह आढळल्याची घटना सोमवार (दि.८) रोजी रात्री आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान विवाहीतेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून सदरील प्रकार खूनाचा असल्याचा आरोप करत या प्रकरणातील सासरच्या लोकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाहीत अशी भुमिका मयत विवाहीतेच्या माहेरकडील लोकांनी घेतली आहे.
बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील संध्या पवन कुटे (वय २३) या विवाहीतेचा मृतदेह सोमवार (दि.८) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास परिसरातील विहीरीत आढळून आला. मयत विवाहीतेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालया आणण्यात आला असून या घटनेनंतर सासरकडील एकही व्यक्ती जिल्हा रूग्णालयाकडे फिरकला सुध्दा नव्हता. विवाहीतेच्या माहेरकडील नातेवाईकांनी मात्र सासरच्याच लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भुमिका नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रूग्णालय परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या चार पोलीस अधिकाऱ्यांसह दहा कर्मचारी जिल्हा रूग्णालय परिसरात थांबून आहेत.दुपारी उशिरापर्यंत प्रकरणाची कार्यवाही सुरु होती.
