केज प्रतिनिधी : तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. एका ५० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या अवघ्या ३ वर्षांच्या नातीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली आपल्या आईसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आली होती. या दरम्यान १६ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत आरोपी आजोबाने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पीडित मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने तिने आईकडे घडलेला प्रकार सांगितला. आपल्या वडिलांनीच पोटच्या नातीसोबत असे कृत्य केल्याचे समजताच आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला १ मे रोजी रात्री उशिरा अटक केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
