अंबाजोगाई अशोक दळवे :-
अंबाजोगाई शहरातील रिंगरोडवरील बँक कॉलनी परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत लहू आणि अंकुश सुरवसे यांचा “विराट इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी फर्निचर” हा व्यवसाय पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत दुकान, गोडाऊन तसेच फर्निचर तयार करण्याचा कारखाना जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मध्यरात्री लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट दूरवरूनही दिसत होते. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला सहकार्य केले.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांच्या मागणीसाठी दुकानात नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी आणि तयार फर्निचरचा मोठा साठा करण्यात आला होता. तसेच कारखान्यात विविध प्रकारचे फर्निचर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांत सर्व साहित्य जळून खाक झाले. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभा केलेला व्यवसाय डोळ्यादेखत जळताना पाहून सुरवसे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत कारण अग्निशमन विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाकडून पंचनामा आणि नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू असून व्यापारी वर्गातून सुरवसे कुटुंबीयांना मदतीची मागणी होत आहे.
