रस्ता मोकळा करा हनुमान नगरातील नागरिकांचा प्रशासनाला इशारा
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर परिसरातील सर्व्हे क्रमांक ६१३ मधील सार्वजनिक रस्त्यावर कथित अतिक्रमण झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित अतिक्रमण तातडीने हटविण्यात न आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, नगर परिषद हद्दीतील सरकारी जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकरणी यापूर्वी अनेक वेळा नगर परिषद तसेच वरिष्ठ प्रशासनाकडे अर्ज व निवेदने देण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अतिक्रमणाबाबत आवश्यक कागदपत्रे व पुरावे प्रशासनाकडे सादर करूनही रस्ता मोकळा करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आलेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
यापूर्वी १३ ऑगस्ट २०२५ रोजीही नगर परिषदेकडे या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रश्न कायम राहिल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
निवेदनात प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, अर्ज दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित अतिक्रमण हटवून सार्वजनिक रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला नाही, तर नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात येईल.
तसेच आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलनकर्त्याच्या जीवित अथवा वित्तहानीची घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी, नगर परिषद, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अपर जिल्हाधिकारी तसेच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात सुशीला लाडके, भारत लाडके, संगीता काचरे, सुधाकर काचरे, शांताबाई पवार, सुभाष लोहार, हेमंत लोहार, बद्री शर्मा, वीरेंद्र शर्मा, विश्वदीप पवार, विष्णू खर्मा, शीतल शर्मा, नंदू शितोळे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग दर्शविला आहे.
दरम्यान, नागरिकांच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगर परिषद प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि सार्वजनिक रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कोणती भूमिका घेते, याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.
