
अंबाजोगाई प्रतिनिधी :–सावत्र मुलासोबत घरातून निघून गेलेल्या महिलेने संबंधित तरुणाच्या मृत्यूनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनिजवळा परिसरातील ही घटना आहे. संबंधित महिला काही दिवसांपूर्वी तिच्या सावत्र मुलासोबत घरातून निघून गेली होती. यानंतर दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संबंधित महिलेचा शोध हैदराबाद येथे लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर महिलेचा पती साहेबराव पवार यांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा गावी आणले होते.दरम्यान, ज्या तरुणासोबत महिला घरातून गेली होती, त्या तरुणाने चिंचोली माळी शिवारात विषारी औषध सेवन केल्याची घटना घडली होती. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २७ मे रोजी त्याचा मृत्यु झाला.तरुणाच्या मृत्यूनंतर संबंधित महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर २८ मे रोजी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या परिसरातील शौचालयाजवळ असलेल्या झाडाला साडीच्या पदराने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंधांबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी सुरू असून अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
