अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहरातील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत सराईत आरोपीस अटक केली असून, चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर हद्दीत दि. 13 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि. 18 मे 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रभाकर रघुनाथ मुंडे, रा. अंबाजोगाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी दि. 19 मे 2026 रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 182/2026 कलम 305, 331(3), (4) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान, दि. 27 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा अंबाजोगाई येथील सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे, रा. सैनिक कॉलनी, मोरेवाडी ता. अंबाजोगाई याने आपल्या दोन साथीदारांसह केला आहे. तसेच आरोपी हे यशवंतराव चव्हाण चौकाजवळ मोरेवाडी रोड परिसरात थांबले असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शिवम जनक कसबे याच्यासह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 1 लाख 50 हजार रुपये, हस्तगत करण्यात आले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनंत शिंदे, पोउपनि सुशांत सुतळे, पोह मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णु सानप, गोविंद भताने, युनूस बागवान, गोविंद राख, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे व पांडुरंग काळे यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.
